मुल्ला, २९ नोव्हेंबर
"आजच्या आधुनिक आणि स्पर्धात्मक युगात संगणकीय ज्ञानाला जागतिक स्तरावर अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. जगाशी स्पर्धा करायची असेल, तर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही संगणकाचे ज्ञान अवगत असणे गरजेचे आहे. रस्ते, नाल्या आणि इतर पायाभूत सुविधांचा विकास करणे आवश्यकच आहे; मात्र त्यापेक्षाही विद्यार्थ्यांचे शिक्षण आणि त्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची संधी उपलब्ध करून देणे अधिक महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन आमदार संजय पुराम यांनी केले.
गोंदिया जिल्ह्यातील आमगाव विधानसभा क्षेत्र हे दुर्गम व ग्रामीण भागात विस्तारलेले असून, या भागातील विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी जिल्हा परिषद शाळांना संगणक व प्रिंटर उपलब्ध करून देण्याचा उपक्रम राबविण्यात आला. एकूण ४० लक्ष ६० हजार रुपयाच्या निधीतून आमगाव विधानसभा क्षेत्रातील १०० पेक्षा अधिक पटसंख्या असलेल्या २९ जिल्हा परिषद केंद्रीय शाळांना संगणक व प्रिंटरचे वितरण २८ नोव्हेंबर रोजी पुराडा येथे करण्यात आले.
या उपक्रमांतर्गत सालेकसा तालुक्यातील १०, देवरी तालुक्यातील ११ आणि आमगाव तालुक्यातील ८ अशा एकूण २९ शाळांची निवड करण्यात आली. या संगणक व प्रिंटरमुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष संगणक हाताळण्याची संधी मिळणार असून, त्यांच्या संगणकीय ज्ञानात वाढ होण्यासह डिजिटल शिक्षणाच्या माध्यमातून भविष्यातील स्पर्धांसाठी तयार होण्यास मदत होणार आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार संजय पुराम होते. प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषद महिला व बालकल्याण समितीच्या माजी सभापती तथा जिल्हा परिषद सदस्या सविता पुराम, देवरीचे गटशिक्षणाधिकारी गणेश ताकसांडे, सालेकसाचे गटशिक्षणाधिकारी विशाल डोंगरे, आमगावचे गटशिक्षणाधिकारी राहुल जगताप तसेच सालेकसा भाजप मंडळ अध्यक्ष देवराम चुटे उपस्थित होते.
यावेळी सविता पुराम यांनीही आपल्या मनोगतातून "मानवी जीवनातील संगणकाचे वाढते महत्त्व विशद केले. शिक्षण, माहिती आणि दैनंदिन जीवनातील विविध क्षेत्रांत संगणकाची भूमिका महत्त्वपूर्ण ठरत असून, विद्यार्थ्यांनी लहान वयापासूनच संगणकीय ज्ञान आत्मसात करावे", असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन टिकेश बोपचे यांनी केले. या उपक्रमाला आमगाव विधानसभा क्षेत्रातील शिक्षक, नागरिक व संबंधित शाळांचे प्रतिनिधी उपस्थित होते. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या प्रवाहाशी जोडण्याच्या दृष्टीने २९ शाळांना संगणक व प्रिंटर वितरणाचा हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे.