कटरच्या ठिणगीने ड्रममधील गॅसचा घेतला पेट,दुर्घटनेचे सीसीटीव्ही चित्रण समोर
गोंदिया. २६ नोव्हेंबर
शहरातील छोटा गोंदिया परिसरातील शिवनगर येथे २५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी वेल्डिंग वर्कशॉपमध्ये लोखंडी ड्रम कापण्याचे काम सुरू असताना अचानक झालेल्या भीषण स्फोटात वर्कशॉप संचालकाचा मृत्यू झाला. योगेश रहांगडाले वय ३६ वर्ष असे मृतकाचे नाव असून, या दुर्घटनेचे संपूर्ण दृश्य वर्कशॉपमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, योगेश रहांगडाले यांची शिवनगर परिसरात वेल्डिंग वर्कशॉप आहे. बुधवारी सायंकाळी ते कटर मशीनच्या साहाय्याने एका लोखंडी ड्रमचा वरचा भाग कापत होते. याचवेळी कटरमधून बाहेर पडलेली ठिणगी ड्रममध्ये शिल्लक असलेल्या गॅसच्या संपर्कात आल्याने अचानक जोरदार स्फोट झाला. स्फोटाची तीव्रता एवढी होती की, योगेश गंभीर जखमी झाले.
घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी तातडीने त्यांना उपचारासाठी शहरातील दवाखान्यात दाखल केले. मात्र, वैद्यकीय तपासणीनंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
लोखंडी ड्रम कापण्याच्या कामा दरम्यान घडलेल्या या दुर्दैवी दुर्घटनेत एका तरुण व्यावसायिकाचा जीव गेल्याने शिवनगर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. अचानक घडलेल्या या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.
Tags
अपघात