भंडारा, २० नोव्हेंबर
तुमसर शहरातील शंभर टक्के शासन अनुदानित असलेले 'नगरपरिषद माकडे विद्यालय' कायमस्वरूपी बंद करून तेथील शिक्षक व विद्यार्थ्यांचे इतर शाळांमध्ये समायोजन करण्याच्या प्रक्रियेला ‘स्वराज्य युवा एकता फाऊंडेशन’चे संस्थापक अध्यक्ष अमित मेश्राम यांच्या नेतृत्वात तीव्र विरोध दर्शवून मुख्याधिकारी करण कुमार चव्हाण यांना निवेदन देण्यात आला. एका बाजूला राज्य शासन मराठी शाळांच्या सक्षमीकरणासाठी ‘हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे नागरी लोककल्याण अभियान’ राबवत असताना, दुसरीकडे तुमसर नगरपरिषद अनुदानित शाळा बंद करण्याच्या तयारीत असल्याने संताप व्यक्त होत आहे. याप्रकरणी शाळा दुरुस्त करून ती पूर्ववत सुरू करण्याचे निवेदन स्वराज्य फाऊंडेशनच्या वतीने दि. २० नोव्हेंबर शुक्रवारी रोजी नगरपरिषद प्रशासन व शिक्षण विभागाला देण्यात आले आहे.
तुमसर नगरपरिषदेच्या ३१ ऑगस्ट २०२६ रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत ठराव क्र. १४/२ मंजूर करण्यात आला. या ठरावानुसार, सन २०२५-२६ च्या संच मान्यतेत माकडे विद्यालयाची मंजूर विद्यार्थी संख्या शून्य असल्याचे दर्शवून तेथील ३ शिक्षक व १ मुख्याध्यापक असे एकूण ४ जण अतिरिक्त ठरवण्यात आले. यातील ३ शिक्षकांचे न.प. नेहरू विद्यालयात, तर १ शिक्षकाचे कस्तुरबा विद्यालयात समायोजन करण्यात आले असून विद्यार्थ्यांचेही पालकांच्या संमतीने नेहरू विद्यालयात समायोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
राज्य शासनाच्या नगर विकास विभागाने २३ जानेवारी २०२६ रोजी शासन निर्णय निर्गमित करून नागरी क्षेत्रातील विशेषतः मराठी शाळांची गुणवत्ता वृद्धी आणि सुविधा विकासासाठी 'हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे नागरी लोककल्याण अभियान' जाहीर केले आहे. सद्यस्थितीत नगरपरिषदेकडे नव्याने अनुदानित शाळा उभारण्याची क्षमता नसताना, अस्तित्वात असलेली शंभर टक्के अनुदानित शाळा बंद करणे हे सर्वसामान्य विद्यार्थ्यांच्या हिताविरोधात असल्याचे अमित मेश्राम यांनी निवेदनात म्हटले आहे. या अभियानांतर्गत शाळेच्या इमारतीची दुरुस्ती करून तिथे सुधारणा केल्यास हे विद्यालय पुन्हा जोमाने सुरू होऊ शकते, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
माकडे विद्यालय बंद करण्यास शिक्षण उपसंचालक नागपूर विभाग यांनी अधिकृत मंजुरी दिल्याचा आदेश तसेच नेमक्या कोणत्या शासन निकषानुसार शाळा बंद करून शिक्षकांचे समायोजन केले गेले, याच्या प्रमाणित प्रतींची मागणी फाऊंडेशनच्या वतीने करण्यात आली आहे. नगरपरिषद प्रशासन व शिक्षण विभागाने तात्काळ दखल घेऊन शाळा बंद करण्याचा निर्णय रद्द करावा आणि माकडे विद्यालय पुनर्जीवित करावे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला. निवेदन देताना स्वराज्य सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अमित मेश्राम यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते सलमान पठाण, स्वराज्य युवा एकता फाऊंडेशनचे पदाधिकारी आनंद पंचबुद्धे, अभिषेक सेलोकर, निशांत चावके, वृषभ नागोसे, अविनाश सेलोकर, अभिषेक ठाकरे, शुभम तिजारे, हर्षल चावके, विक्की पांडेय व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
"स्वराज्य सामाजिक संस्थेच्या निवेदन प्राप्त झाला असून त्या अनुषंगाने नगरपरिषद माकडे शाळेच्या नव्याने बांधकामासाठी सर्वसाधारण सभेत विषय ठेवण्यासाठी संबंधित विभागाला उचित निर्देश दिले आहे."
–करण कुमार चव्हाण, मुख्याधिकारी, नगर परिषद तुमसर, जिल्हा भंडारा.
Tags
भंडारा