लोहारा.२९ नोव्हेंबर
वय लहान असले तरी जिद्द, मेहनत आणि आत्मविश्वासाच्या जोरावर मोठे यश संपादन करता येते, हे देवरी तालुक्यातील चारभाटा येथील अवघ्या नऊ वर्षांच्या तन्नू पाथोडे हिने सिद्ध करून दाखविले. सुरतोली येथे आयोजित मेगा मॅरेथॉन स्पर्धा २०२६ मध्ये खुल्या महिला गटाच्या आठ किलोमीटर धावण्याच्या स्पर्धेत सहभागी होत तिने अवघ्या ४३ मिनिटांत अंतर पूर्ण केले. विशेष म्हणजे, मोठ्या वयोगटातील महिला धावपटूंशी स्पर्धा करीत तिने सहावा क्रमांक पटकाविला.
तन्नू ही इयत्ता चौथीत शिकत असून, एवढ्या कमी वयात आठ किलोमीटरची शर्यत पूर्ण करण्याची तिची कामगिरी उपस्थितांसाठी कौतुकाचा विषय ठरली. नियमित सराव, शारीरिक मेहनत आणि धावण्याची आवड यामुळे तिने हे यश संपादन केले.
तन्नू ही सुरतोली येथील कमांडो फिजिकल अकॅडमीमध्ये नियमित प्रशिक्षणासह, धावण्याचाही सराव करीत आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमधील क्रीडागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी अकॅडमीकडून केले जाणारे प्रयत्न तन्नूच्या यशामुळे अधोरेखित झाले आहेत.
या उल्लेखनीय कामगिरीबद्दल माजी आमदार सहसराम कोरोटे यांच्या हस्ते तन्नूचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी तिच्या जिद्दीचे कौतुक करीत पुढील क्रीडा वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
अवघ्या नऊ वर्षांच्या वयात खुल्या महिला गटात सहावा क्रमांक मिळविणाऱ्या तन्नूने ग्रामीण भागातील मुलींसमोर प्रेरणादायी आदर्श निर्माण केला आहे. तिच्या या यशाबद्दल चारभाटा ग्रामस्थ, कमांडो फिजिकल अकॅडमीचे संस्थापक रोशन दुबे आणि क्रीडाप्रेमींनी अभिनंदन केले असून, भविष्यात ती राज्य व राष्ट्रीय स्तरावर चमकावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
Tags
क्रीडा