"रक्तदान हेच खऱ्या अर्थाने मानवसेवा व देशसेवेचे कार्य " - ठाणेदार अजित पाटील



नवेगावबांध पोलीस ठाण्यात २६/११ शहिदांच्या स्मृतीत रक्तदान शिबिराचे आयोजन 

नवेगावबांध, २७ नोव्हेंबर 
 मुंबई येथे २६ नोव्हेंबर २००८ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात देशाच्या रक्षणासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या शूर जवानांसह निष्पाप नागरिकांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी नवेगावबांध पोलीस ठाण्याच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. ठाणेदार अजित पाटील यांच्या पुढाकारातून आणि पोलीस कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने आयोजित या सामाजिक उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. डॉ. हेडगेवार ब्लड सेंटर, रामनगर,नागपूर यांच्या सहकार्याने पार पडलेल्या या शिबिरात एकूण ३२ रक्तदात्यांनी रक्तदान करून मानवसेवेचा संदेश दिला.

शिबिराचे आयोजन प्रसंगी ठाणेदार अजित पाटील यांनी मार्गदर्शनात "रक्तदान हे केवळ सामाजिक कार्य नसून गरजू रुग्णांना जीवनदान देणारे अमूल्य योगदान आहे. अपघात, शस्त्रक्रिया तसेच विविध वैद्यकीय उपचारांदरम्यान रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध होणे अत्यंत महत्त्वाचे असते. त्यामुळे प्रत्येकाने रक्तदानासाठी पुढाकार घ्यावा. रक्तदान हेच खऱ्या अर्थाने मानवसेवा व देशसेवेचे कार्य" असल्याचे प्रतिपादन केले.
 यावेळी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष जगदीश पवार, पोलीस कर्मचारी, सर्व पोलीस पाटील तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी २६/११ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या शौर्याचे आणि सर्वोच्च बलिदानाचे स्मरण करून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
शिबिरात उत्स्फूर्तपणे रक्तदान करणाऱ्या सर्व ३२ रक्तदात्यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. रक्तदात्यांच्या सहभागामुळे शिबिराला सामाजिक उपक्रमाचे स्वरूप प्राप्त झाले.
या रक्तदान शिबिराच्या यशस्वितेसाठी पराग ठोसर, प्रियांका बोरकर, वैष्णवी पवार, शुभांगी नेवारे, प्रिया थोरात, शिवप्रसाद, प्रवीण आणि गोपी यांनी विशेष परिश्रम घेतले.
२६/११ च्या शहिदांच्या स्मृतींना अभिवादन करताना रक्तदानाच्या माध्यमातून गरजू रुग्णांच्या जीवनाला आधार देण्याचा संदेश नवेगावबांध पोलीस ठाण्याने दिला. शौर्य, त्याग आणि मानवतेचा संगम घडविणारा हा उपक्रम पोलीस दलाच्या सामाजिक बांधिलकीचे प्रेरणादायी उदाहरण ठरला.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने