नवेगावबांध येथे संविधान दिन उत्साहात साजरा

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन;
 संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन, समता-स्वातंत्र्य-बंधुतेचा संदेश

नवेगावबांध, २७ नोव्हेंबर 
भारतीय संविधान दिनाचे औचित्य साधून नवेगावबांध ग्रामपंचायत कार्यालयात २६ नोव्हेंबर रोजी संविधान दिन मोठ्या उत्साहात आणि अभिमानपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करून संविधानातील लोकशाही मूल्यांचा जागर करण्यात आला. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून उपस्थितांनी अभिवादन केले.

या कार्यक्रमाला ग्रामपंचायत अधिकारी हंसराज गजभिये, सरपंच हिराबाई पंधरे, उपसरपंच रमेश डोंगरवार, ग्रामपंचायत सदस्य प्रियांका सांगोळकर, पूजा कापगते, आशा सेविका यशोधरा डोंगरे, ग्रामपंचायत कर्मचारी अशोक परशुरामकर, विलीन बडोले, छगन बलोदे, दीपक परशुरामकर यांच्यासह शलिक लंजे, खुशाल मडावी, रवि पात्रे, जुमनाके, आगाशे तसेच गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी मार्गदर्शन करताना सरपंच हिराबाई पंधरे यांनी भारतीय संविधानाने प्रत्येक नागरिकाला समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय ही अमूल्य तत्त्वे प्रदान केली असून, ही मूल्ये केवळ संविधानापुरती मर्यादित न ठेवता ती आपल्या आचरणातून जपली पाहिजेत, असे आवाहन केले. संविधानाचे रक्षण करणे आणि त्यातील मूल्यांचा सन्मान करणे हीच महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना खरी आदरांजली ठरेल, असेही त्यांनी नमूद केले.

उपसरपंच रमेश डोंगरवार यांनी संविधान हे केवळ कायद्याचे पुस्तक नसून प्रत्येक भारतीय नागरिकाच्या हक्कांचे, कर्तव्यांचे आणि सन्मानाने जगण्याचे अधिष्ठान असल्याचे सांगितले. संविधानातील विचार प्रत्येकाने आपल्या जीवनात आत्मसात केल्यास समाजात समता, एकता आणि बंधुभाव अधिक दृढ होईल, असे मत व्यक्त केले.

संविधान दिनाच्या निमित्ताने ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित या कार्यक्रमातून संविधानाप्रती आदर, सामाजिक बांधिलकी आणि लोकशाही मूल्यांची जपणूक करण्याचा संदेश देण्यात आला. उपस्थितांच्या सहभागामुळे कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने