सिंचन विभाग व जिल्हा प्रशासनाकडे पाठपुरावा करण्याचे आमदार संजय पुराम यांचे आश्वासन
मुल्ला.२७ नोव्हेंबर
आमगाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या रब्बी हंगामातील धान लागवडीचा प्रश्न ऐरणीवर आला असून, बाघ डाव्या प्रकल्पातून रब्बी धान पिकासाठी सिंचनाचे पाणी उपलब्ध करून देण्याची मागणी आमगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी आमदार संजय पुराम यांच्याकडे केली असून यासंदर्भात शेतकऱ्यांनी त्यांना निवेदनही सादर केले.
यावर्षी समाधानकारक पाऊस झाल्याने शिरपूर, कालीसराड आणि पुजारीटोला या जलाशयांमध्ये पुरेसा पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे या जलसाठ्याचा उपयोग रब्बी हंगामातील धान लागवडीसाठी करण्यात यावा, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. वेळेत सिंचनासाठी पाणी उपलब्ध झाल्यास रब्बी धान लागवडीला चालना मिळून शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळू शकतो असे शेतकऱ्यांचे मत आहे.
रब्बी हंगामात पाणी उपलब्ध न झाल्यास शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडण्याची शक्यता असून, त्याचा थेट परिणाम शेतीवर अवलंबून असलेल्या शेतमजुरांच्या रोजगारावरही होऊ शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक हिताचा आणि ग्रामीण भागातील रोजगाराचा विचार करून बाघ डाव्या प्रकल्पाचे पाणी रब्बी धान पिकासाठी उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे.
शेतकऱ्यांच्या या मागणीचे गांभीर्य लक्षात घेऊन आमदार संजय पुराम यांनी सिंचन विभाग तसेच जिल्हा प्रशासनाकडे आवश्यक पाठपुरावा करून रब्बी धान लागवडीसाठी पाणी उपलब्ध होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्यात येतील, असे आश्वासन दिले.
रब्बी हंगामातील धान लागवडीचा प्रश्न मार्गी लागण्यासाठी आता सिंचन विभाग आणि जिल्हा प्रशासनाच्या निर्णयाकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
Tags
शेती विषयक