गोंदियात ‘आरोग्य संवाद यात्रा’ चे शुभारंभ

'आरोग्य संवाद यात्रा' शुभारंभ प्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी झेनित चंद्रा दोंतुला व उपस्थित मान्यवर 

ग्रामीण जनतेच्या दारी चित्ररथ व एलईडी व्हॅनद्वारे पोहोचणार आरोग्यविषयक माहिती

गोंदिया,२७ नोव्हेंबर 
राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत सन २०२६-२७ मध्ये राबविण्यात येणाऱ्या ‘आरोग्य संवाद यात्रा – आरोग्याचा संवाद, जनतेच्या दारी’ या राज्यस्तरीय जनजागृती मोहिमेचा गोंदिया जिल्ह्यात उत्साहात शुभारंभ करण्यात आला. २६ नोव्हेंबर रोजी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी झेनित चंद्रा दोंतुला, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभिजीत गोल्हार आणि जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पुरुषोत्तम पटले यांच्या हस्ते चित्ररथ व एलईडी मोबाईल व्हॅनला हिरवी झेंडी दाखवून रवाना करण्यात आले.

शासनाच्या विविध आरोग्य योजना, प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि शासकीय रुग्णालयांतील सुविधांची माहिती ग्रामीण भागातील नागरिकांपर्यंत पोहोचवणे, हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे. चित्ररथावरील कलाकारांच्या माध्यमातून प्रबोधनात्मक कार्यक्रम, तर एलईडी मोबाईल व्हॅनद्वारे आरोग्यविषयक माहितीपट व योजनांचे व्हिडिओ गावोगावी दाखविण्यात येणार आहेत.

यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी झेनित चंद्रा दोंतुला यांनी, माहितीअभावी अनेक नागरिक शासकीय आरोग्य योजनांपासून वंचित राहतात. त्यामुळे आरोग्य संवाद यात्रा ग्रामीण जनतेपर्यंत आरोग्य सेवा व योजनांची माहिती पोहोचविण्यासाठी प्रभावी माध्यम ठरेल, असे सांगितले. 

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभिजीत गोल्हार यांनी शेवटच्या घटकापर्यंत योजनांची माहिती पोहोचविण्यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज असल्याचे स्पष्ट केले. तर जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पुरुषोत्तम पटले यांनी माता-बाल संगोपनासह संसर्गजन्य व असंसर्गजन्य आजारांबाबत जनजागृतीचे महत्त्व अधोरेखित केले.

कार्यक्रमाला जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी विजय आखाडे, जिल्हा साथरोग अधिकारी डॉ. निरंजन अग्रवाल, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक अर्चना वानखेडे, विस्तार अधिकारी मिलिंद नंदागवळी, प्रशांत खरात, काळे, लिचडे, कल्याणी चौधरी यांच्यासह राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने