आमगाव,२९ नोव्हेंबर
शेतकरी, शेतमजूर आणि सर्वसामान्य नागरिकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी शेतकरी संघर्ष कृती समिती व काँग्रेस पक्षाच्या संयुक्त विद्यमाने १ ते ८ डिसेंबर २०२६ दरम्यान गडचिरोली ते नागपूर असा १७५ किलोमीटरचा पायी मोर्चा काढण्यात येणार आहे. नागपूर येथे सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनादरम्यान हा मोर्चा विधान भवनावर धडक देऊन सरकारला २४ कलमी मागण्यांचे निवेदन सादर करणार आहे.
खासदार डॉ. नामदेव किरसान यांचे प्रतिनिधी अॅड. दुष्यंत किरसान व गोंदिया जिल्हा काँग्रेस कमिटीचे सचिव इसुलाल भालेकर यांनी संयुक्त प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती नुसार. मोर्चात प्रामुख्याने आमगाव, सालेकसा व देवरी तालुक्यातील शेतकऱ्यांना रब्बी पिकांसाठी सिंचनाचे पाणी उपलब्ध करून देणे, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई, धान उत्पादकांना तीन हेक्टरपर्यंत ७५ हजार रुपये बोनस, दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना प्रति हेक्टर ५० हजार रुपये मदत आणि धानाला ३,१०० रुपये प्रतिक्विंटल भाव देण्याची मागणी करण्यात येणार आहे. त्याबरोबरच खतांचे दर कमी करणे, शेतकरी कर्जमाफी, थकीत नमो शेतकरी सन्मान निधीचे हप्ते आणि २४ तास वीजपुरवठा या मागण्यांचाही समावेश आहे.
याशिवाय सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार, मनरेगाअंतर्गत कामे, जलजीवन मिशनची रखडलेली कामे पूर्ण करणे, घरकुलाची थकीत देयके, जनावरांसाठी चारा, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, घरकुल व जमिनीचे पट्टे नियमित करणे, तसेच आमगाव परिसरातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेणे आदी प्रश्नही सरकारसमोर मांडण्यात येणार आहेत.
शेतकरी, शेतमजूर, युवक, महिला, विद्यार्थी आणि नागरिकांनी या जनहिताच्या लढ्यात मोठ्या संख्येने सहभागी होऊन मोर्चाला बळ द्यावे, असे आवाहन अॅड. दुष्यंत किरसान व इसुलाल भालेकर यांनी केले आहे.
Tags
धडक मोर्चा