देवरी–मेहताखेडा बससेवा पूर्ववत सुरू करण्याची साकोली आगाराला मागणी

बसअभावी विद्यार्थ्यांची गैरसोय; करावी लागते पायपीट

देवरी, २९ नोव्हेंबर
देवरी–फुटाणा–मेहताखेडा मार्गावरील महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या साकोली आगाराची बससेवा जवळपास गेल्या  दोन वर्षांपासून बंद असल्याने फुटाणा, पलानगाव व मेहताखेडा परिसरातील विद्यार्थी आणि ग्रामस्थांची मोठी गैरसोय होत आहे. त्यामुळे बंद बससेवा तातडीने पूर्ववत सुरू करावी, अशी मागणी विद्यार्थी, पालक व ग्रामस्थांनी केली आहे.
पूर्वी या मार्गावर नियमित दोन बसफेऱ्या सुरू होत्या. देवरी येथील शाळा व महाविद्यालयांत जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही बस महत्त्वाचे साधन होते. मात्र, बस बंद झाल्याने विद्यार्थ्यांना सध्या देवरी–चिचगड मार्गावरील बसने प्रवास करून शिंदीबिरी येथे उतरावे लागते. तेथून पुढे फुटाणा परिसरातील गावांपर्यंत पायी जावे लागत असल्याने विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होत आहे. पलानगाव व मेहताखेडा येथील विद्यार्थ्यांनाही प्रवासाच्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
त्यामुळे साकोली आगाराने देवरी–फुटाणा–मेहताखेडा मार्गावरील पूर्वीच्या दोन्ही बस फेऱ्या पुन्हा सुरू कराव्यात, अशी मागणी होत आहे. तसेच ही बस मेहताखेड्यापुढे ककोडीपर्यंत जोडल्यास परिसरातील इतर गावांतील प्रवाशांनाही नियमित वाहतुकीची सुविधा उपलब्ध होणार असून, राज्य परिवहन महामंडळालाही त्याच्या फायदा होऊ शकते, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
विद्यार्थ्यांची शैक्षणिक गैरसोय आणि ग्रामीण भागातील प्रवाशांची अडचण लक्षात घेऊन साकोली आगाराने या मार्गावरील बससेवा तातडीने पूर्ववत सुरू करावी, अशी मागणी परिसरातील विद्यार्थी, पालक व ग्रामस्थांनी केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने