भंडारा,१४ नोव्हेंबर
जिल्ह्यात वाघ आणि बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अवघ्या १५ दिवसांत वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात तीन जणांचा मृत्यू झाल्याने मानव-वन्यजीव संघर्ष गंभीर बनला आहे. पवनी तालुक्यातील तिर्री गावात घरातील पाळण्यात झोपलेल्या सहा महिन्यांच्या बालकाला बिबट्याने उचलून नेल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेत बालकाचा मृत्यू झाल्याने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अभिमन बोंद्रे यांचा सहा महिन्यांचा बालक घरात पाळण्यात झोपलेला असताना सायंकाळी सुमारे ६.३० वाजता बिबट्याने घरात प्रवेश केला. त्यावेळी बालकाची आई हेमलता बोंद्रे स्वयंपाक करीत होत्या. बिबट्याने बालकाला उचलून नेल्याचे लक्षात येताच आईने आक्रोश करीत पाठलाग केला. ग्रामस्थांनी शोधमोहीम सुरू केली असता बिबट्या जवळील तुरीच्या शेतात असल्याचे आढळले. काही वेळानंतर बालक मिळाले; मात्र त्याचा मृत्यू झाला होता.
१५ दिवसांत तीन जणांचा बळी
यापूर्वी ५ नोव्हेंबर रोजी लाखांदूर तालुक्यातील दोनाड शेतशिवारात आठ वर्षीय मोक्ष सचिन बुरडे याचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता. त्यानंतर लाखनी तालुक्यातील बामणी येथे २७ वर्षीय कुणाल ऊर्फ विशाल उईके याचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला. आता तिर्री येथील बालकाच्या मृत्यूने जिल्ह्यातील परिस्थिती अधिकच चिंताजनक झाली आहे.
वनविभागाच्या उपाययोजनांची मागणी
घटनेची माहिती मिळताच वनविभाग व पोलीस प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. ग्रामीण भागात वन्यप्राण्यांचा वाढता वावर लक्षात घेता संवेदनशील गावांमध्ये गस्त वाढवावी, वन्यप्राण्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवावे आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
अवघ्या पंधरा दिवसांत तीन जणांचा बळी जाणे ही गंभीर बाब असून वन्यजीवांचे संरक्षण करतानाच मानवी जीविताचे रक्षण करण्यासाठी वनविभागाने तातडीने ठोस पावले उचलावीत, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.