बेपत्ता युवकाचा मृतदेह शेतात आढळला,पुराडा गावात खळबळ!

                  मृतक-रोहित शिवचरण आचले

 विद्युत प्रवाहाच्या धक्क्याने मृत्यू झाल्याचा संशय; सालेकसा पोलिसांकडून तपास सुरू

गोंदिया/मुल्ला १४ नोव्हेंबर.

 देवरी तालुक्यातील सालेकसा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पुराडा गावात दहा दिवसांपासून बेपत्ता असलेल्या ३३ वर्षीय युवकाचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह शेतात आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. रोहित शिवचरण आचले वय ३३, रा.पुराडा, ता.देवरी असे मृत युवकाचे नाव असून,१४ नोव्हेंबर रोजी सकाळी ६.३० वाजताच्या सुमारास ही घटना उघडकीस आली.

मिळालेल्या माहितीनुसार, रोहित आचले हा ४ नोव्हेंबर पासून बेपत्ता होता. कुटुंबीयांनी त्याचा सर्वत्र शोध घेतला; मात्र तो न मिळाल्याने ७ नोव्हेंबर रोजी सालेकसा पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. दरम्यान, शनिवारी गावातील लीला कुवरलाल मेहर यांच्या शेतात त्याचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला.

विद्युत प्रवाहाच्या धक्क्याची प्राथमिक शक्यता

स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रोहित हा लाख गोळा करण्याच्या उद्देशाने शेतात गेला असावा. संबंधित झाडाजवळ विद्युत खांब असल्याने त्याला विद्युत प्रवाहाचा धक्का लागला असण्याची प्राथमिक शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, त्याच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

दहा दिवसांपासून बेपत्ता असलेल्या युवकाचा मृतदेह अशा अवस्थेत आढळल्याने पुराडा गावात हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेमागील नेमके कारण काय, याबाबत परिसरात चर्चा सुरू असून, सालेकसा पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने