गोंदिया शहरातील लक्ष्मीनगर परिसरात कारवाई;
गोंदिया, १६ नोव्हेंबर
गोंदिया शहर पोलीस पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे गौतम बुद्ध वॉर्ड, लक्ष्मीनगर परिसरात कारवाई करून एका इसमाला पिस्तूल (अग्निशस्त्र), दोन जिवंत काडतुसे व मॅगझीनसह ताब्यात घेतले. नागसेन बोधीमन्तो (वय ४४), रा. गौतम बुद्ध वॉर्ड, श्रीनगर, गोंदिया असे आरोपीचे नाव आहे.
पोलीस पथक पेट्रोलिंग करीत असताना संबंधित इसम पिस्तूल बाळगून फिरत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी परिसरात पाहणी केली असता एका दुकानासमोर संशयास्पदरीत्या फिरणाऱ्या इसमाला ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता कमरेला लपवून ठेवलेले पिस्तूल, दोन जिवंत काडतुसे व मॅगझीन आढळून आले.
याप्रकरणी आरोपीविरुद्ध गोंदिया शहर पोलीस ठाण्यात कलम ३, २५ भारतीय हत्यार कायद्यान्वये १६ नोव्हेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास सपोनि वैभव गोडाम करीत आहेत.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक गौरव भामरे, अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे, उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेशचंद्र शुक्ला व पोलीस निरीक्षक प्रवीण बोरकुटे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी पोलीस निरीक्षक तिरपती राणे यांच्या नेतृत्वात करण्यात आली असून पोलीस पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या कारवाईत सहभाग घेतला.
Tags
गुन्हेगारी