सौंदड रेल्वे क्रॉसिंग उड्डाणपुलासमोर ट्रकला ट्रेलरची धडक

दोन्ही वाहन चालक जखमी

सौंदड, २५ ऑक्टोबर 

सौंदड रेल्वे क्रॉसिंग उड्डाणपुलासमोरील ब्रेकरजवळ २४ ऑक्टोबर रोजी पहाटे ४ वाजताच्या सुमारास आयशर ट्रकला मागून येणाऱ्या ट्रेलरने जोरदार धडक दिली. या अपघातात दोन्ही वाहनांचे चालक जखमी झाले असून, आयशर ट्रक उलटल्याची माहिती आहे.
प्राप्त माहितीनुसार, आयशर ट्रक क्रमांक एम.एच ४० ए.एके ४०८४ ला ट्रेलर क्रमांक सी.जी.१२ बी.एच.६१९२ ने धडक दिली. यात ट्रेलर चालक नवीन प्रतापसिंग कालीरामन वय ३२, रा. मुंबई यांच्या पायाला दुखापत झाली. त्यांना पुढील उपचारासाठी गोंदिया येथील रुग्णालयात हलविण्यात आले. तर आयशर चालक ऋषभ जनार्दन मडावी वय २६, रा. पारडी, नागपूर किरकोळ जखमी झाले असून, त्यांच्यावर सौंदड येथे उपचार सुरू आहेत.
उड्डाणपुलावरील एकेरी वाहतूक आणि अपुऱ्या प्रकाशव्यवस्थेमुळे ब्रेकरजवळ वाहनचालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. संबंधित ठिकाणी पुरेशी प्रकाशव्यवस्था आणि सुरक्षित वाहतुकीसाठी आवश्यक उपाययोजना करण्याची गरज व्यक्त होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने