घरकुल, गोट्यांचे, वैयक्तिक लाभाचे पैसे आणि मजुरांची मजुरी रखडली
गोंदिया/मुल्ला. शुक्रवार, २३ ऑक्टोबर २०२६
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या (मनरेगा) नावात बदल होऊन ‘जी राम जी’ असे नवीन नाव झाल्यानंतर तांत्रिक अडचणींमुळे देवरी पंचायत समितीअंतर्गत विविध कामांची देयके प्रलंबित असल्याचा प्रश्न समोर आला आहे. घरकुलांचे, गोट्यांचे तसेच वैयक्तिक लाभाच्या कामांचे देयक आणि मजुरांच्या मजुरीचे पैसे थकीत असल्याने लाभार्थ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
ग्रामीण भागातील अनेक लाभार्थी शासनाच्या विविध योजनांतून मिळणाऱ्या आर्थिक मदतीवर अवलंबून आहेत. घरकुल बांधकामाचे हप्ते, गोट्यांसाठीची देयके आणि वैयक्तिक लाभाच्या कामांची रक्कम वेळेत मिळणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे रोजगार हमी योजनेअंतर्गत काम करणाऱ्या मजुरांना त्यांच्या श्रमाचा मोबदला वेळेत मिळणे गरजेचे आहे. मात्र, देयके प्रलंबित राहिल्याने घरकुलांची कामे पूर्ण करण्यासह दैनंदिन खर्च भागविण्यात अडचणी येत आहेत.
तांत्रिक अडचणी दूर करून देयके तातडीने द्या!
देवरी पंचायत समितीचे सभापती अनिलकुमार बिसेन यांच्या निदर्शनास हा प्रश्न आणून देण्यात येत असून, संबंधित विभागाने तांत्रिक अडचणी दूर करून प्रलंबित देयके तातडीने अदा करण्यासाठी कार्यवाही करावी, अशी अपेक्षा नागरिकांची व्यक्त होत आहे.
घरकुलांचे, गोट्यांचे व वैयक्तिक लाभाच्या कामांचे थकीत देयक तसेच मजुरांची प्रलंबित मजुरी लवकर मिळाल्यास लाभार्थ्यांना दिलासा मिळू शकतो. त्यामुळे संबंधित यंत्रणेने या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देऊन देयक वितरणाची प्रक्रिया गतीमान करावी, अशी मागणी होत आहे.
अनिलकुमार बिसेन
“जी राम जी योजनेच्या अंमलबजावणीत निर्माण झालेल्या तांत्रिक अडचणी शासन लवकरात लवकर दूर करेल, असा विश्वास आहे. घरकुल बांधकाम,गोटे, वैयक्तिक लाभाच्या योजनांची प्रलंबित देयके तसेच मजुरांची मजुरीची रक्कम लाभार्थ्यांपर्यंत वेळेत पोहोचण्यासाठी जी रामजी यंत्रणेने आवश्यक कार्यवाही करीत आहे. तांत्रिक अडचणींमुळे सर्वसामान्य लाभार्थी आणि मजुरांना आर्थिक त्रास सहन करावा लागू नये, यासाठी शासनस्तरावर तातडीने उपाययोजना राबवली जात आहे.”
Tags
गोंदिया