देवरी तालुक्यात धान पिकावर मावा रोगाचा प्रादुर्भाव

धान उत्पादक चिंतेत 

गोंदिया / मुल्ला,   शुक्रवार, २३ ऑक्टोबर 

देवरी तालुक्यातील शेतकऱ्यांसमोर संकटांची मालिका सुरूच असून, आधी अवकाळी पावसामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना आता धान पिकावर मावा किडीच्या प्रादुर्भावाचा सामना करावा लागत आहे. हातातोंडाशी आलेल्या धान पिकावर किडीचा प्रादुर्भाव वाढत असल्याने शेतकरी चिंतेत पडले असून, यंदाच्या हंगामातील उत्पादनावर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

देवरी तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांची आर्थिक मदार धान पिकावर अवलंबून आहे. खरीप हंगामात मोठ्या मेहनतीने आणि खर्च करून शेतकऱ्यांनी धानाची लागवड केली. मात्र, अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान होण्याची चिंता आधीच सतावत असताना आता मावा किडीच्या प्रादुर्भावाने शेतकऱ्यांसमोर नवे आव्हान उभे केले आहे. एकीकडे हवामानाच्या लहरीपणाचा फटका, तर दुसरीकडे पिकांवरील किडीचा धोका, अशा दुहेरी संकटात धान उत्पादक शेतकरी सापडला आहे.

शेतीसाठी लागणारा वाढता खर्च, खते-बियाण्यांचे दर आणि मजुरीचा बोजा यामुळे शेतकरी आधीच आर्थिक विवंचनेत आहे. अशा परिस्थितीत धान पिकाचे नुकसान झाल्यास उत्पादन घटण्याबरोबरच आर्थिक गणितही कोलमडण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत आणखी भर पडली आहे.

धान पिकावरील मावा किडीच्या प्रादुर्भावाची संबंधित विभागाने तातडीने पाहणी करून बाधित क्षेत्राचे सर्वेक्षण करावे. शेतकऱ्यांना किडीचे अचूक निदान, योग्य प्रतिबंधात्मक उपाय आणि आवश्यक मार्गदर्शन उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

 

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने