कर्तव्यावरील पोलीस हवालदाराचा अपघातात मृत्यू

 

 भरधाव आयशर ट्रकची धडक; ट्रॅक्टरचालक गंभीर

भंडारा/मुल्ला   २५ ऑक्टोबर 

 राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वरील कोरंभी बायपासजवळ आजीमाबाद परिसरात कर्तव्यावर असताना झालेल्या अपघातात वाहतूक शाखेचे पोलीस हवालदार किशोर हटवार यांचा मृत्यू झाला. या घटनेत ट्रॅक्टरचालक गंभीर जखमी झाला असून, आयशर ट्रकचालक फरार आहे.
२४ ऑक्टोबर रोजी पहाटे ४.४० वाजता वाहतूक शाखेचे पथक गस्तीवर असताना हवालदार हटवार ट्रॅक्टरचालकाची चौकशी करण्यासाठी वाहन बाजूला थांबवत होते. त्याचवेळी भरधाव आयशर ट्रकने त्यांना धडक दिली. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. जखमी ट्रॅक्टरचालकावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
कारधा पोलिसांनी गुन्हा नोंदवून फरार चालकाचा शोध सुरू केला असून, टोलनाक्यांवरील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे.
हटवार यांच्या बोरगाव (बु.) येथील निवासस्थानातून अंत्ययात्रा काढण्यात आली. ‘किशोरभाऊ अमर रहे’च्या घोषणांत पोलिसांनी गार्ड ऑफ ऑनर देत शासकीय सन्मानाने अंत्यसंस्कार केले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, आई-वडील व भाऊ असा परिवार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने