उपविभागीय पोलीस अधिकारी राजेश तटकरे यांच्या आदेशाने धडक कारवाई
२९ हजार ४०० रुपयांचा दारूसाठा जप्त; दोघांविरुद्ध गुन्हे दाखल
अर्जुनी/ मोरगाव. २६ ऑक्टोबर
देवरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी राजेश तटकरे यांच्या आदेशाने अवैध दारूविक्रीविरोधात धडक कारवाई करण्यात आली. २३ ऑक्टोबर रोजी अर्जुनी/मोरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील महागाव येथे ही कारवाई करण्यात आली आहे.
गुप्त बातमीदाराकडून अवैध दारूविक्रीची माहिती मिळाल्यानंतर राजेश तटकरे यांच्या पोलीस पथकाने महागाव येथे छापा टाकला. यावेळी किशोरसिंह शिवकुमारसिंह पवार (वय ४०) यांच्या पानठेल्याची तपासणी केली असता देशी दारूच्या ९० मिलीच्या ५०० बाटल्या आढळून आल्या.
तसेच परसराम लक्ष्मण जहांगिवार (वय ४०, रा. महागाव) यांच्या घराच्या छतावरील प्लास्टिक पिशवीत ९० मिलीच्या १६० बाटल्या आणि १८० मिलीच्या मॅकडॉवेल क्रमांक वनच्या १२ बाटल्या आढळल्या. दोन्ही ठिकाणांहून एकूण २९ हजार ४०० रुपयांचा दारूसाठा जप्त करण्यात आला.
या प्रकरणी अर्जुनी/मोरगाव पोलीस ठाण्यात विविध कलमान्वे गुन्हे दाखल करण्यात आले.
पोलीस अधीक्षक गोरख भामरे व अप्पर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी राजेश तटकरे यांच्या आदेशानुसार पोलीस उपनिरीक्षक किरण मेश्राम, पोलीस हवालदार रवींद्र दहिफळे, हर्षे, पेंदाम आणि महिला पोलीस शिपाई कविता राठोड यांनी ही कारवाई केली असून परिसरात अवैध दारू विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहे.
Tags
गोंदिया