जिल्हास्तरीय शालेय रोड रेस सायकलिंग स्पर्धा उत्साहात


१०० खेळाडूंचा सहभाग 

गोंदिया, २६ ऑक्टोबर 
क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा परिषद, गोंदिया यांच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय शालेय रोड रेस सायकलिंग स्पर्धा २४ ऑक्टोबर रोजी रावणवाडी येथील आरटीओ चेकपोस्ट परिसरात उत्साहात पार पडली. या स्पर्धेत जिल्ह्यातील सुमारे १०० खेळाडूंनी सहभाग घेतला.
स्पर्धेत टाइम ट्रायल आणि मास स्टार्ट या प्रकारांचा समावेश होता. खेळाडूंनी वेग, सहनशक्ती आणि कौशल्याच्या जोरावर आपली कामगिरी सादर केली. या स्पर्धेमुळे शालेय सायकलिंगपटूंना आपले क्रीडागुण सिद्ध करण्याची संधी मिळाली.
या प्रसंगी रावणवाडी पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षक ओंकार अनिता धेंडे, सायकलिंग असोसिएशन गोंदियाचे डॉ. विनोद पटेल व डॉ. महेंद्र हेमने, अंकुश गजभिये, क्रीडा शिक्षक पंकज बोरकर, जितेंद्र पलांदुरकर, अतुल बिसेन, प्रतीक लाडेकर आणि शुभम पिसोडे उपस्थित होते. स्पर्धेतील पंच म्हणून अक्षय बनकर यांनी काम पाहिले.
जिल्हा क्रीडा अधिकारी राहुल देशमुख यांनी विजेत्या खेळाडूंचे अभिनंदन केले. तसेच गोंदिया येथे होणाऱ्या विभागीय सायकलिंग स्पर्धेसाठी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. जिल्ह्यातील खेळाडूंनी विभागीय स्तरावरही उत्कृष्ट कामगिरी करून जिल्ह्याचा नावलौकिक वाढवावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
...

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने