अवैध हातभट्टी दारू विक्रीप्रकरणी प्रतिबंधात्मक कारवाई; कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांचे पाऊल
गोंदिया, दि. २५ ऑक्टोबर
आगामी सण-उत्सव शांततेत आणि निर्विघ्नपणे पार पडावेत, जिल्ह्यात सार्वजनिक शांतता व कायदा-सुव्यवस्था कायम राहावी तसेच वाढत्या गुन्हेगारीला आळा बसावा, यासाठी गोंदिया पोलिसांकडून सातत्याने प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येत आहे. याच मोहिमेअंतर्गत तिरोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अवैध हातभट्टी दारू विक्री करणाऱ्या तीन आरोपींना एक महिन्यासाठी हद्दपार करण्यात आले आहे.
हद्दपार करण्यात आलेल्या आरोपींमध्ये मेहंदीपूर येथील विशाल ऊर्फ यशवंत सूर्यवंशी (वय ३८), अहिंसात सूर्यवंशी (वय ५३) आणि करटी येथील अनिल कुकडे (वय ३२) यांचा समावेश आहे.
प्राप्त माहितीनुसार, संबंधित आरोपींविरुद्ध यापूर्वीही अनेकदा प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली होती. मात्र, त्यांच्या वर्तनात सुधारणा झाली नाही. अवैध हातभट्टी दारूच्या विक्रीमुळे गावासह परिसरातील नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता. दारूच्या कारणावरून वादविवाद आणि भांडणांच्या घटना घडत असल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत होता.
या पार्श्वभूमीवर नागरिकांची सुरक्षितता आणि सार्वजनिक शांतता राखण्याच्या दृष्टीने पोलिसांनी संबंधित तिन्ही आरोपींविरुद्ध एक महिन्यासाठी हद्दपारीची कारवाई केली.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक गोरख भामरे, अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे यांच्या निर्देशानुसार, उपविभागीय पोलीस अधिकारी (गोंदिया) गजानन गुल्हाने आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रेवचंद सिंगनजुडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
तिरोडा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी अमित वानखडे, हवालदार प्रकाश गायधने, छगन विठ्ठले, पोलीस शिपाई कैलास ठाकरे आणि हवालदार नितेश गोस्वामी यांनी या कारवाईत सहभाग घेतला.