सडक सुरक्षा मित्र-२०२६’ उपक्रमांतर्गत सडक अर्जुनी येथे विशेष कार्यशाळा, IIT मद्रासच्या तज्ज्ञांकडून प्रात्यक्षिकांसह प्रशिक्षण

सडक अर्जुनी, २१ नोव्हेंबर 
रस्ते अपघातांचे प्रमाण कमी करून नागरिकांमध्ये वाहतूक नियमांविषयी जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने भारत सरकारच्या रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालय (MoRTH) तसेच युवा व्यवहार व क्रीडा मंत्रालय यांच्या संयुक्त पुढाकारातून ‘सडक सुरक्षा मित्र-२०२६’ हा महत्त्वाकांक्षी उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत २० नोव्हेंबर रोजी रंभाजी राव बापू दीक्षित शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI), सडक अर्जुनी येथे विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेत संस्थेतील ९७ विद्यार्थ्यांनी स्वयंसेवक म्हणून नोंदणी करून रस्ता सुरक्षा जनजागृतीचा संकल्प केला.
सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत आयोजित या कार्यशाळेत CoERS, IIT मद्रास यांच्या प्रशिक्षण पथकातील रस्ता सुरक्षा तज्ज्ञ कर्नल संजीव शर्मा व रणजीत चौधरी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी वाहतूक नियमांचे पालन, हेल्मेट व सीटबेल्टचा अनिवार्य वापर, अतिवेगाचे दुष्परिणाम, वाहन चालविताना मोबाईलचा वापर टाळणे आणि अपघात रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना याबाबत प्रात्यक्षिकांसह प्रशिक्षण देण्यात आले.

या उपक्रमांतर्गत ITI सडक अर्जुनीच्या एकूण ९७ विद्यार्थ्यांनी MY Bharat पोर्टलवर ‘सडक सुरक्षा मित्र’ स्वयंसेवक म्हणून नोंदणी केली. या सर्व विद्यार्थ्यांना एकदिवसीय विशेष प्रशिक्षण देऊन प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. प्रशिक्षित विद्यार्थी भविष्यात आपल्या परिसरात रस्ता सुरक्षा जनजागृती करणे, नागरिकांना वाहतूक नियमांचे महत्त्व पटवून देणे तसेच अपघात प्रतिबंधात्मक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेणे, अशी महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार आहेत.

या कार्यशाळेचे आयोजन पोलीस अधीक्षक लोहित मतानी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस केंद्र डोंगरगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजू बस्तवाडे, ITI सडक अर्जुनीचे प्राचार्य वासनिक, त्यांचे सहकारी शिक्षक, पोलीस उपनिरीक्षक रंजित मट्टामी, अनेशसिंह राठोड तसेच महामार्ग पोलीस विभागातील कर्मचाऱ्यांनी केले. यावेळी NHAI चे पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

रस्ता सुरक्षा ही केवळ प्रशासनाची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे, हा संदेश या कार्यशाळेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यात आला.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने