राष्ट्रीय धावण्याच्या स्पर्धेसाठी ईशांत ब्राह्मणकरची निवड, दिल्लीतील १० किलोमीटरच्या स्पर्धेत करणार देशाचे प्रतिनिधित्व

कुणबी समाज संस्थेतर्फे आई-वडिलांच्या उपस्थितीत गौरव

सडक अर्जुनी, २१ नोव्हेंबर 
जिद्द, मेहनत आणि सातत्यपूर्ण सरावाच्या जोरावर ग्रामीण भागातील युवकही राष्ट्रीय स्तरावर आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवू शकतात, हे सडक अर्जुनी येथील ईशांत चिलिया ब्राह्मणकर याने सिद्ध करून दाखविले आहे. दिल्ली येथे आयोजित राष्ट्रीय स्तरावरील १० किलोमीटर धावण्याच्या स्पर्धेसाठी ईशांतची निवड झाली असून, या स्पर्धेत तो देशाचे प्रतिनिधित्व करणार आहे. त्याच्या या यशामुळे सडक अर्जुनीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

मिनिस्ट्री ऑफ यूथ अफेअर्स अँड स्पोर्ट्स अंतर्गत आयोजित राष्ट्रीय स्तरावरील ॲथलेटिक्स स्पर्धेसाठी ईशांतची निवड झाली आहे. यापूर्वी २२ ऑगस्ट २०२६ रोजी दिल्ली येथे झालेल्या राज्यस्तरीय धावण्याच्या स्पर्धेत सहभागी होत त्याने आपल्या धावण्याच्या कौशल्याची चुणूक दाखविली होती. सातत्यपूर्ण सराव, कठोर परिश्रम आणि खेळाप्रती असलेल्या समर्पणाच्या बळावर त्याने राष्ट्रीय स्पर्धेपर्यंत मजल मारली आहे.

ईशांतच्या या उल्लेखनीय यशाची दखल घेत सडक अर्जुनी येथील कुणबी समाज संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी त्याच्या निवासस्थानी भेट देऊन आई-वडिलांच्या उपस्थितीत शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन त्याचा गौरव केला. यावेळी पदाधिकाऱ्यांनी त्याचे अभिनंदन करीत आगामी राष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. ग्रामीण भागातील युवकांनी क्रीडा क्षेत्रात पुढे येऊन आपल्या गुणवत्तेच्या बळावर मोठे यश संपादन करावे, यासाठी ईशांतचे यश निश्चितच प्रेरणादायी असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

याप्रसंगी कुणबी समाज संस्थेचे अध्यक्ष माधोराव तरोणे, सचिव दिनेश हुकरे, संस्था सदस्य तथा नगरसेवक देवचंद तरोणे, सरपंच प्रतिभा भेंडारकर, सरपंच तुळशीदास शिवणकर, सदस्य प्रमिला कोरे, सदस्य अरुण डोये, प्रभाकर भेंडारकर, तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष बिरला गणवीर आदी उपस्थित होते.
ईशांतच्या या यशामुळे सडक अर्जुनी परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. आगामी राष्ट्रीय स्पर्धेतही त्याने दमदार कामगिरी करीत यशाची नवी उंची गाठावी आणि आपल्या गावासह गोंदिया जिल्ह्याचा नावलौकिक देशपातळीवर वाढवावा, अशा सदिच्छा यावेळी व्यक्त करण्यात आल्या.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने