ग्रामीण खेळाडूंना क्रीडा स्पर्धांतून कौशल्य सिद्ध करण्याची संधी - रचनाताई गहाणे

गुडरी येथे क्रिकेट व कबड्डी स्पर्धांचा थाटात शुभारंभ; आमदार राजकुमार बडोले यांच्या हस्ते उद्घाटन

अर्जुनी-मोर. २१ नोव्हेंबर
ग्रामीण भागातील युवकांमध्ये क्रीडाविषयक आवड निर्माण होऊन त्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा, यासाठी अशा क्रीडा स्पर्धांचे आयोजन महत्त्वाचे आहे. ग्रामीण भागातील खेळाडूंनाही योग्य व्यासपीठ व प्रोत्साहन मिळाल्यास ते तालुका, जिल्हा, राज्य व राष्ट्रीय स्तरावर आपली ओळख निर्माण करू शकतात, असे प्रतिपादन जिल्हा परिषद सदस्या रचनाताई गहाणे यांनी केले.
गुडरी/सानगडी येथील नवतरुण सांस्कृतिक क्रीडा मंडळाच्या वतीने मिनी स्टेडियम, पाण्याच्या टाकीजवळ भव्य क्रिकेट व कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचे उद्घाटन आमदार इंजी. राजकुमार बडोले यांच्या हस्ते, तर सहउद्घाटन जिल्हा परिषद अध्यक्ष लायकरामजी भेंडारकर यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रचनाताई गहाणे होत्या.
यावेळी पंचायत समिती सभापती आश्र्वपाली डोंगरवार, पंचायत समिती सदस्य पुष्पलता देवेंदर दुग्धकर यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर, लोकप्रतिनिधी व क्रीडाप्रेमी उपस्थित होते.
स्पर्धेत क्रिकेट व कबड्डी या दोन्ही खेळांचा समावेश असून आकर्षक रोख पारितोषिके ठेवण्यात आली आहेत. क्रिकेट स्पर्धेत प्रथम १५ हजार व द्वितीय १० हजार रुपये, तर कबड्डी स्पर्धेत प्रथम १५ हजार, द्वितीय १२ हजार, तृतीय ९ हजार व चतुर्थ ६ हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे.
यावेळी मार्गदर्शन करताना रचनाताई गहाणे यांनी युवकांनी मोबाईलच्या आहारी न जाता मैदानी खेळांना प्राधान्य द्यावे. खेळातून शिस्त, संघभावना, खिलाडूवृत्ती व आत्मविश्वास विकसित होतो. त्यामुळे ग्रामीण भागातील युवकांनी क्रीडा क्षेत्रात पुढे येऊन आपल्या कौशल्याला योग्य दिशा द्यावी, असे आवाहन केले.
या स्पर्धेमुळे परिसरातील खेळाडूंना आपले क्रीडाकौशल्य दाखविण्याची संधी मिळणार असून गुडरी परिसरात क्रीडा वातावरणाला चालना मिळणार आहे. स्पर्धेच्या यशस्वितेसाठी नवतरुण सांस्कृतिक क्रीडा मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व गावातील युवक परिश्रम घेत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने