राज्यस्तरीय तलवारबाजी स्पर्धेत निश्चलचा सुवर्णवेध तर आरोषीची कांस्यपदकाला गवसणी



 
गोंदिया, २ नोव्हेंबर 
जालना येथे आयोजित राज्यस्तरीय शालेय तलवारबाजी स्पर्धेत शहरातील भारतीय ज्ञानपीठ स्कूलच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्राचा मान उंचावला आहे. निश्चल सुरेश लिल्हारे याने सुवर्णपदक, तर आरोषी काशिनाथ ताराम हिने कांस्यपदक पटकावत शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला.
क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि जिल्हा क्रीडा परिषद, जालना यांच्या वतीने २९ ते ३१ ऑक्टोबर २०२६ दरम्यान जालना येथील जिल्हा क्रीडा संकुलात राज्यस्तरीय शालेय तलवारबाजी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत राज्यातील विविध जिल्ह्यांतील खेळाडूंनी सहभाग घेत आपले कौशल्य पणाला लावले.
स्पर्धेतील ईपी प्रकारात १४ वर्षांखालील मुलांच्या गटात निश्चल सुरेश लिल्हारे याने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करीत सुवर्णपदकावर नाव कोरले. तर १४ वर्षांखालील मुलींच्या गटात आरोषी काशिनाथ ताराम हिने जिद्द, चिकाटी आणि कौशल्याच्या जोरावर कांस्यपदकाची कमाई केली.
दोन्ही खेळाडूंनी मिळविलेल्या या यशामुळे जिल्ह्यात आनंदाचे वातावरण आहे. विद्यार्थ्यांच्या मेहनतीला मिळालेली ही यशाची पावती असून, शालेय स्तरावर क्रीडा क्षेत्रातील गुणवत्तेला योग्य मार्गदर्शन आणि प्रोत्साहन मिळाल्यास विद्यार्थी राज्यस्तरावरही चमकदार कामगिरी करू शकतात, हे या यशाने अधोरेखित केले आहे.
या यशाचे श्रेय खेळाडूंनी आपल्या आई-वडिलांसह शाळेचे संस्थापक जे.पी. लिल्हारे, प्राचार्या पूजा लिल्हारे, क्रीडा शिक्षक उज्ज्वल बानासुरे, शाळेतील सर्व शिक्षक तसेच फेंसिंग संघटनेचे अध्यक्ष पुष्कर सावंत यांना दिले.
खेळाडूंचे जिल्हा क्रीडा अधिकारी लक्ष्मीशंकर यादव, क्रीडा अधिकारी अभय महल्ले, राहुल देशमुख, तालुका क्रीडा अधिकारी पूजा श्रीवास्तव यांनी कौतुक करून त्यांच्या पुढील क्रीडा वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
...

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने