भूमिगत वीजवाहिनीच्या कामासाठी ४० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून द्या – आमदार संजय पुराम व नगराध्यक्ष संजू उके यांची मागणी
देवरी, ३ नोव्हेंबर
शहरातील नागरिकांना वारंवार होणाऱ्या वीजपुरवठ्याच्या अडचणी आणि विद्युत खांबांमुळे निर्माण होणाऱ्या अपघातांचा धोका लक्षात घेता शहरात भूमिगत विद्युत वाहिनी टाकण्याची महत्त्वपूर्ण मागणी करण्यात आली आहे. या कामासाठी सुमारे ४० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याची मागणी आमगाव–देवरी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजय पुराम आणि देवरी नगरपंचायतीचे नगराध्यक्ष संजू उके यांनी केली आहे.
यासंदर्भात राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची प्रत्यक्ष भेट घेऊन निवेदन सादर करण्यात आले. देवरी शहरात भूमिगत विद्युत वाहिनी टाकल्यास रस्त्यांवरील विद्युत खांब आणि लटकत्या तारांमुळे निर्माण होणाऱ्या संभाव्य अपघातांना आळा बसण्यास मदत होणार आहे. तसेच शहरातील रस्ते विद्युत खांबमुक्त होऊन शहराच्या सौंदर्यातही भर पडणार आहे.
आमदार संजय पुराम यांनी आपल्या निवेदनात आमगाव–देवरी विधानसभा क्षेत्र हे आदिवासीबहुल, अत्यंत दुर्गम आणि नक्षलग्रस्त क्षेत्र असल्याचे नमूद केले. या भागात भूमिगत विद्युत वाहिनी नसल्यामुळे अनेक ठिकाणी विद्युत खांबांवर लटकणाऱ्या तारांमुळे नागरिक आणि पशुधनाच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.
४० कोटींच्या निधीची मागणी
देवरी शहरात भूमिगत विद्युत वाहिनीचे काम तातडीने सुरू करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन योजनेअंतर्गत सुमारे ४० कोटी रुपयांचा निधी मंजूर करून उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी आमदार संजय पुराम आणि नगराध्यक्ष संजू उके यांनी केली. या मागणीची दखल घेत मंत्री गिरीश महाजन यांनी संबंधित प्रस्ताव सादर करण्याबाबत तातडीने निर्देश दिल्याचे सांगण्यात आले.
भूमिगत विद्युत वाहिनीचा प्रकल्प मार्गी लागल्यास देवरी शहरातील विद्युत व्यवस्थेला सुरक्षितता मिळण्याबरोबरच नागरिकांना दिलासा मिळणार आहे. त्यामुळे या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी शासनाकडून लवकरात लवकर निधी मंजूर होण्याकडे देवरीकरांचे लक्ष लागले आहे.
Tags
गोंदिया