नक्षलग्रस्त पिपरखारी परिसरात पोलिसांचा दिवाळी मिलनाचा सामाजिक उपक्रम!


 उपविभागीय पोलीस अधिकारी राजेश तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम आयोजन

 १४५ आदिवासी बांधवांना जिवनावश्यक साहित्य व मिठाईचे वाटप 

गोंदिया/मुल्ला.  २ नोव्हेंबर 

गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेलगत असलेल्या अतिसंवेदनशील व नक्षलग्रस्त भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या देवरी तालुक्यातील पिपरखारी परिसरात गोंदिया जिल्हा पोलीस दलाने सामाजिक बांधिलकी जपत दिवाळी मिलन कार्यक्रमाचे आयोजन केले. दादालोरा पोलीस खिडकी योजनेंतर्गत गोंदिया जिल्हा पोलीस दल व माऊली सेवा संघ, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने मौजा पिपरखारी येथे १ नोव्हेंबर रोजी हा उपक्रम उत्साहात पार पडला.
गोंदिया जिल्हा पोलीस अधीक्षक गोरख भामरे व अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे यांच्या संकल्पनेतून तसेच देवरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी राजेश तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
या उपक्रमांतर्गत पिपरखारी, गौरीटोला, महाजनटोला व पुरामटोला येथील गरीब आदिवासी कुटुंबांतील एकूण १४५ बांधव, महिला व गरजू नागरिकांना साड्या, ब्लँकेट, मिठाई, चिवडा तसेच इतर जीवनावश्यक साहित्याचे वाटप करण्यात आले. दिवाळीच्या सणानिमित्त पोलिसांकडून मिळालेल्या या मदतीमुळे आदिवासी बांधवांच्या चेहऱ्यावर आनंदाचे वातावरण निर्माण झाले.
नक्षलग्रस्त व दुर्गम भागातील नागरिकांशी पोलिसांचे नाते अधिक दृढ व्हावे, आदिवासी समाजातील नागरिकांमध्ये विश्वास व सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी आणि पोलीस दलाची सकारात्मक प्रतिमा जनमानसात रुजावी, या उद्देशाने अशा सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येत असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.
कार्यक्रमाला माऊली सेवा संघ, नागपूरचे सुहास खरे व त्यांची संपूर्ण टीम, चिचगड पोलीस ठाण्याचे ठाणेदार जनार्दन हेगडकर, एओपी पिपरखारीचे प्रभारी पोलीस उपनिरीक्षक नेताम, चिचगड ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. जाटवे, पोलीस अधिकारी व अंमलदार तसेच परिसरातील मोठ्या संख्येने गावकरी, महिला व आदिवासी बांधव उपस्थित होते.

 पोलिसांचा सामाजिक पुढाकार कौतुकास्पद 

कायदा व सुव्यवस्था राखण्यासोबतच दुर्गम आणि नक्षलग्रस्त भागातील नागरिकांच्या सुख-दुःखात सहभागी होऊन त्यांच्याशी आपुलकीचे नाते निर्माण करण्याचा गोंदिया जिल्हा पोलीस दलाचा हा उपक्रम निश्चितच कौतुकास्पद ठरत आहे. अशा उपक्रमांमुळे पोलीस आणि सामान्य नागरिकांमधील विश्वासाचे नाते अधिक दृढ होण्यास मदत मिळत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने