रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांना पाणी व ५ हजारांची दुष्काळी मदत सरसकट द्या - माजी आमदार सहेषराम कोरोटे यांची मुख्यमंत्र्यांना मागणी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन सादर करतांना माजी आमदार सहेषराम कोरोटे 

आमगाव विधानसभा क्षेत्रातील पाचही धरणांमध्ये मुबलक जलसाठा उपलब्ध असल्याचे कोरोटेंचे मत

देवरी, २६ नोव्हेंबर 
आमगाव विधानसभा क्षेत्रातील देवरी व सालेकसा तालुक्यांतील शिरपूर, पुजारीटोला, कालिसराड, मानाकुई व बेवारटोला या पाचही धरणांमध्ये यावर्षी मुबलक जलसाठा उपलब्ध आहे. या पाण्याचा उपयोग रब्बी हंगामातील शेतीसाठी करून शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून द्यावे, तसेच शासनाने जाहीर केलेली ५ हजार रुपयांची दुष्काळी मदत सर्व पात्र शेतकऱ्यांना सरसकट वितरित करावी, अशी मागणी माजी आमदार सहेषराम कोरोटे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

पाचही धरणांमध्ये मागील वर्षाच्या तुलनेत अधिक पाणीसाठा असल्याचे नमूद करून संबंधित यंत्रणेला शेतीसाठी पाणी उपलब्ध करून देण्याचे आदेश द्यावेत, अशी निवेदनात मागणी करण्यात आली आहे.

आमगाव विधानसभा क्षेत्रातील बहुतांश शेती भातपिकावर अवलंबून असून, खरीप हंगामानंतर रब्बी पीक शेतकऱ्यांसाठी आर्थिक आधार ठरते. रब्बी पिकांच्या उत्पादनातून शेतकऱ्यांना कुटुंबाचा खर्च, मुलांचे शिक्षण व इतर गरजा भागविण्यास मदत होते. त्यामुळे उपलब्ध जलसाठ्याचे योग्य नियोजन करून शेतीला प्राधान्याने पाणी द्यावे, अशी भूमिका कोरोटे यांनी मांडली आहे.

तसेच देवरी तालुक्यातील उद्योगांमध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याचा वापर होत असल्याचा मुद्दा उपस्थित करत शेतीच्या पाणीपुरवठ्याला प्राधान्य देण्याची मागणी त्यांनी केली आहे. धरणांमध्ये मुबलक पाणी असतानाही शेतकरी रब्बी सिंचनापासून वंचित राहू नयेत, यासाठी शासनाने तातडीने निर्णय घेऊन आर्थिक मदतीचे वितरण करावे, असेही कोरोटे यांनी निवेदनात नमूद केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने