शहीद पोलीस अधिकारी आणि निष्पाप नागरिकांना रक्तदानातून भावपूर्ण आदरांजली
चिचगड, २६ नोव्हेंबर
मुंबई येथे २६ नोव्हेंबर २००८ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले पोलीस अधिकारी, अंमलदार तसेच निष्पाप नागरिक यांच्या स्मृतीप्रित्यर्थ गोंदिया जिल्हा पोलीस विभागाच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
पोलीस स्टेशन चिचगड येथे २६ नोव्हेंबर रोजी डॉ. हेडगेवार रक्तकेंद्र, रामनगर, नागपूर यांच्या सहकार्याने हे रक्तदान शिबिराचे आयोजन ठाणेदार सपोनि. जनार्दन हेगडकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. या शिबिराला पोलीस अधिकारी, अंमलदार तसेच परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या शिबिरात एकूण ९० पोलीस अधिकारी, अंमलदार व नागरिकांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडविले.
रक्तदान हे श्रेष्ठ सामाजिक कार्य असून, गरजू रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध होण्यास अशा उपक्रमांचा मोठा हातभार लागतो. शहीदांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासोबतच लोककल्याणकारी कार्याला हातभार लावण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.
या रक्तदान शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी पोलीस उपनिरीक्षक वासुदेव, जयश्री गव्हाणे, नेताम, राऊत, सहाय्यक फौजदार हिरासिंग कनपुरिया, उषा मलये, पोलीस हवालदार नितीन शिरपूरकर, राधेश्याम गाते, बाळकृष्ण राऊत, सोहन कोरेटी, संजीव गावळ, पोलीस शिपाई संदीप तांदळे तसेच पोलीस स्टेशन चिचगड येथील सर्व पोलीस कर्मचारी आणि पोलीस पाटील यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
Tags
रक्तदान शिबिर