चालकाच्या सतर्कतेने वाचले ३६ प्रवाशांचे प्राण !


धोबीसराडजवळ ट्रॅव्हल्सचा अपघात; चालक गंभीर जखमी, 

देवरी.१ नोव्हेंबर 
नागपुर कडुन रायपूरकडे जाणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्सचा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वर धोबीसराड गावाजवळ आज दि.३१ आक्टोंबर ला शनिवारी पहाटे भीषण अपघात झाला. ट्रकला धडक बसल्यानंतर ट्रॅव्हल्सवरील चालकाचे नियंत्रण सुटले. मात्र, प्रसंगाचे गांभीर्य ओळखून चालकाने वाहन दुभाजकाच्या दिशेने वळविल्याने बसमधील ३६ प्रवाशांचे प्राण वाचले. या घटनेत चालक गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर देवरी ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार, CG04QZ3155 क्रमांकाची ट्रॅव्हल्स नागपुर हून रायपूरच्या दिशेने प्रवासी घेऊन जात होती. धोबीसराड परिसरात पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास ओव्हरटेक करताना ट्रॅव्हल्सची ट्रकला धडक बसली. धडक जोरदार असल्याने ट्रॅव्हल्सच्या पुढील भागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या धडकेमुळे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. अशा बिकट परिस्थितीतही चालकाने प्रसंगावधान राखत ट्रॅव्हल्स दुभाजकाच्या दिशेने वळविली. त्यामुळे बसमधील प्रवाशांना मोठ्या संकटातून वाचविण्यात यश आले.
अपघातात चालक गंभीर जखमी झाल्याने त्याला नरेंदाचार्य संस्थानच्या रुग्णवाहिकेच्या मदतीने देवरी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्याच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. सुदैवाने बसमधील इतर ३६ प्रवासी सुखरूप असल्याची माहिती आहे.
दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच देवरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघात नेमका कोणत्या कारणामुळे घडला, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. महामार्गावर वाहनांची वाढती वर्दळ आणि ओव्हरटेक करताना घेतली जाणारी जोखीम पुन्हा एकदा या घटनेतून अधोरेखित झाली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने