हेल्मेट सक्तीची मोहीम थंडावली; दुचाकीस्वारांचा सुरक्षेकडे दुर्लक्ष ‘हेल्मेट’ केवळ नियमापुरतेच!

Maharashtra Chetna
गोंदिया, 22 ऑक्टोबर 
दुचाकी अपघातात जीव वाचविण्यासाठी हेल्मेट हे सर्वात प्रभावी सुरक्षा कवच मानले जाते. मात्र, गोंदिया जिल्ह्यात काही काळ राबविण्यात आलेली हेल्मेट सक्तीची मोहीम आता थंडावल्याने दुचाकीस्वार पुन्हा बिनधास्तपणे हेल्मेटशिवाय रस्त्यावर सुसाट असल्याचे चित्र आहे. अपघात झाल्यानंतर डोक्याला गंभीर दुखापत होऊन अनेकांचा जीव जात असतानाही हेल्मेट वापराबाबत दुचाकीस्वारांमध्ये अपेक्षित गांभीर्य निर्माण झालेले नाही.
जिल्ह्यात जानेवारी ते सप्टेंबर २०२६ या कालावधीत २३० पेक्षा अधिक अपघात झाल्याचे समोर आले आहे. या अपघातांमध्ये १३५ जणांना जीव गमवावा लागला. यातील अनेक मृत्यूंमागे डोक्याला किंवा मेंदूला झालेल्या गंभीर दुखापत हे प्रमुख कारण असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे हेल्मेटचा वापर हा केवळ वाहतूक नियम नसून जीवन-मरणाचा प्रश्न असल्याचे या घटनांनी पुन्हा अधोरेखित केले आहे.
दुचाकीवरून प्रवास करताना केवळ चालकानेच नव्हे, तर मागे बसणाऱ्या व्यक्तीनेही हेल्मेट वापरणे आवश्यक आहे. मात्र, प्रत्यक्ष रस्त्यावर चित्र वेगळेच दिसते. अनेक ठिकाणी चालक हेल्मेटशिवाय असतात, तर काही जण हेल्मेट घातले तरी मागे बसलेली व्यक्ती विनाहेल्मेट प्रवास करताना दिसते. अपघाताच्या वेळी मागे बसलेल्या व्यक्तीलाही गंभीर दुखापत होण्याची शक्यता तितकीच असते. वर्षभरापूर्वी जिल्ह्यात हेल्मेट वापर सक्तीने करण्यासाठी प्रशासन आणि पोलिस विभागाने व्यापक मोहीम हाती घेतली होती. जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालय, नगर परिषदेसह विविध शासकीय कार्यालयांमध्ये कार्यरत अधिकारी-कर्मचाऱ्यांनी दुचाकीवरून येताना हेल्मेट वापरणे बंधनकारक करण्यात आले होते. नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईही करण्यात आली.
या कारवाईचा सुरुवातीला चांगला परिणाम दिसून आला. मात्र, कालांतराने तपासणी आणि कारवाईची तीव्रता कमी होत गेली आणि ‘हेल्मेट सक्ती’चा विषय पुन्हा कागदावरच राहिला. परिणामी, रस्त्यावर हेल्मेटशिवाय धावणाऱ्या दुचाकींची संख्या पुन्हा वाढताना दिसत आहे.
जिल्हा वाहतूक नियंत्रण शाखा आणि पोलिस विभागाकडून हेल्मेट वापराबाबत जनजागृती केली जाते. मात्र, केवळ अधूनमधून जनजागृती करून वाहनचालकांच्या सवयी बदलणार आहेत का, हा प्रश्न निर्माण झाला आहे. मोहीम सुरू करणे आणि काही दिवसांनी ती थांबविणे, या पद्धतीमुळे वाहतूक शिस्त निर्माण होणार नाही.
हेल्मेट वापराची सक्ती ही एखाद्या विशेष मोहिमेपुरती मर्यादित न ठेवता ती वर्षभर सातत्याने राबविणे गरजेचे आहे. विशेषतः शासकीय कार्यालयांतील अधिकारी-कर्मचाऱ्यांपासून नियमाच्या अंमलबजावणीला सुरुवात झाल्यास त्याचा सकारात्मक संदेश समाजात जाऊ शकतो.
हेल्मेट न वापरणाऱ्यांकडून दंड वसूल करणे हा कारवाईचा एक भाग आहे; मात्र त्यामागील मूलभूत उद्देश दुचाकीस्वाराचा जीव वाचविणे हा असला पाहिजे. अपघात झाल्यानंतर कुटुंबाचा आधार गमावण्यापेक्षा अपघातापूर्वी हेल्मेट घालण्याची सवय लावणे अधिक महत्त्वाचे आहे.
गोंदिया जिल्ह्यातील अपघातांची आणि मृत्यूंची संख्या पाहता हेल्मेट वापराबाबत प्रशासनाने पुन्हा एकदा ठोस, सातत्यपूर्ण आणि परिणामकारक मोहीम राबविण्याची गरज आहे. हेल्मेट सक्तीची मोहीम पुन्हा सुरू होऊन ती केवळ काही दिवसांच्या कारवाईपुरती न राहता वर्षभर प्रभावीपणे सुरू राहणार का, हा प्रश्न आता प्रशासनासमोर आहे.

चौकट..

हेल्मेट वापरणे पोलिसांच्या कारवाईपासून वाचण्यासाठीचा नियम नाही, तर स्वतःचा जीव वाचविण्यासाठीची गरज आहे. अपघाताच्या वेळी डोक्याला गंभीर दुखापत होण्याचा धोका मोठा असतो. त्यामुळे दुचाकी चालविताना चालकासह मागे बसणाऱ्या व्यक्तीनेही हेल्मेट वापरले पाहिजे. हेल्मेट वापराबाबत वाहतूक शाखेकडून जनजागृती आणि कारवाई सुरूच आहे. मात्र, नागरिकांनी पोलिसांच्या कारवाईची वाट न पाहता स्वतःहून हेल्मेट वापरण्याची सवय लावून घेणे गरजेचे आहे.”
— नागेश भास्कर, पोलिस निरीक्षक, जिल्हा वाहतूक शाखा, गोंदिया.
...

Post a Comment

Previous Post Next Post