तुमसरच्या बाजारात धानाची आवक वाढली; दर ४,५०० रुपयांवर!

आंतरराष्ट्रीय मागणीचा परिणाम; नवीन बारीक धानाला ३,५०० ते ४,००० रुपये भाव
भंडारा, २२ ऑक्टोबर उच्च प्रतीच्या तांदळासाठी राज्यासह देशभरात प्रसिद्ध असलेल्या तुमसर कृषी उत्पन्न बाजार समितीत धानाची आवक वाढली असून, दरातही लक्षणीय तेजी आली आहे. महिनाभरापूर्वी २,५०० ते ३,००० रुपये प्रतिक्विंटल असलेले धानाचे दर आता ३,५०० ते ४,५०० रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात तांदळाची मागणी वाढल्याने धानाच्या दरात सुधारणा झाल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.

तांदळाचे कोठार आणि कुबेरनगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तुमसरच्या बाजारपेठेत उच्च प्रतीच्या तसेच साधारण प्रतीच्या तांदळाला देश-विदेशातून मागणी असते. सध्या बाजारात कमी कालावधीत तयार होणाऱ्या धानाची आवक वाढली असून, दररोज सुमारे सात हजार पोती धान विक्रीसाठी येत आहे. अचानक वाढलेल्या आवकेमुळे शेतकऱ्यांना धान विक्रीसाठी प्रतीक्षा करावी लागत आहे.

जुन्या बारीक धानाला सर्वाधिक भाव

बाजार समितीत नवीन उच्च प्रतीच्या बारीक धानाला ३,५०० ते ४,००० रुपये, तर गत खरीप हंगामातील जुन्या बारीक धानाला ४,२०० ते ४,५०० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळत आहे. मध्यम प्रतीच्या धानाचे दर २,८०० ते ३,२०० रुपये, तर साधारण ठोकळ धानाला २,१०० ते २,३०० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळत आहे. धानाच्या प्रतवारीनुसार दरात फरक दिसून येत आहे.

उत्पादन घटण्याची शक्यता; दर पाच हजारांवर जाण्याचा अंदाज

यंदाच्या खरीप हंगामात अपुऱ्या पावसासह विविध कीड-रोगांच्या प्रादुर्भावामुळे धानाच्या उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता शेतकरी व्यक्त करीत आहेत. दुसरीकडे, आंतरराष्ट्रीय बाजारात तांदळाची मागणी वाढत असल्याने धानाच्या दरांना आधार मिळत आहे. उत्पादनातील संभाव्य घट आणि मागणीतील तेजी कायम राहिल्यास आगामी काळात धानाचे दर प्रतिक्विंटल पाच हजार रुपयांपर्यंत पोहोचण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे वाढत्या दरांमुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.
...

Post a Comment

Previous Post Next Post