गोंदिया, २२ नोव्हेंबर
राज्यात यंदा दुष्काळाचे संकट निर्माण होण्याची शक्यता असून आगामी काळात पाणीटंचाईची तीव्रता वाढण्याचे संकेत आहेत. उपलब्ध जलसाठा मोठ्या प्रमाणात असला तरी वाढत्या तापमानामुळे होणाऱ्या बाष्पीभवनाचा परिणाम पाणीसाठ्यावर होणार आहे. विशेषतः जून, जुलै आणि ऑगस्ट या कालावधीत धरणांमध्ये पुरेसा पाणीसाठा उपलब्ध राहणार नसल्याची शक्यता लक्षात घेता शेतकऱ्यांनी आतापासूनच पीक नियोजनात बदल करणे आवश्यक आहे. त्यामुळे यंदा मोठ्या प्रमाणात धानाची लागवड टाळून कमी पाण्यात येणाऱ्या पर्यायी पिकांना प्राधान्य द्यावे, असे आवाहन आमदार संजय पुराम यांनी केले आहे.
परिसरातील पाणीसाठा केवळ १०.४० शिल्लक राहणार असल्याने सर्व शेतकऱ्यांना सिंचनासाठी पुरेसे पाणी उपलब्ध करून देणे शक्य होणार नाही. परिणामी धान लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना पाण्याअभावी अडचणींचा सामना करावा लागू शकतो. ही संभाव्य परिस्थिती लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी धान पिकाऐवजी मका, गहू, हरभरा, जवस आणि मोहरी यांसारख्या तुलनेने कमी पाण्याची आवश्यकता असलेल्या पिकांची लागवड करावी, असे आमदार पुराम यांचे मतआहे.
सिंचन व्यवस्थेतील अडचणी दूर करण्यासाठीही प्रशासनाला आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत. ज्या ठिकाणी कालव्यांची कामे प्रलंबित आहेत, त्या ठिकाणी कालव्यांची दुरुस्ती प्राधान्याने करण्याच्या सूचना पाटबंधारे विभागाला देण्यात आल्या आहेत. तसेच कोणत्याही शेतकऱ्याचे वैयक्तिक पाणी कनेक्शन खंडित करण्यात येऊ नये, अशा स्पष्ट सूचनाही संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्याचे आमदार पुराम यांनी सांगितले.
संभाव्य पाणीटंचाईचे संकट टाळण्यासाठी उपलब्ध जलसाठ्याचा विचार करून शेतीचे नियोजन करणे काळाची गरज आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून कमी पाणी लागणाऱ्या पर्यायी पिकांची लागवड करावी, अशी विनंती आमदार संजय पुराम यांनी शेतकऱ्यांना केली आहे.
Tags
पिक नियोजन